कुलस्वामीचे मंदिर आणि श्री लक्ष्मीपल्लीनाथ संस्थानाविषयी
आठशे वर्षांच्या इतिहासाची पुनरावृत्ती
श्री लक्ष्मीपल्लीनाथ हे अनेक कहऱ्हाडे ब्राह्मणांचे कुलदैवत आहे. कहऱ्हाडे ब्राह्मण महाराष्ट्रातल्या क-हाडमधून कोकणात आले, असे मानले जाते. तेथून येताना त्यांनी आपल्या लक्ष्मीरवळनाथ या उपास्य दैवताची प्रतिष्ठापना लक्ष्मीपल्लीनाथाच्या नावाने करंबेळे (सध्याचे पाली) येथे केली. मंदिर साकारले. वर्षानुवर्षे मंदिराची जोपासना आणि अभिवृद्धी केली. वार्षिक उत्सवही साजरा केला; मात्र तेथे सेवा करण्यात अडचणी निर्माण झाल्यानंतर सुमारे आठशे वर्षांनी इतिहासाची पुनरावृत्ती झाली आहे. पुन्हा एकदा नव्या जागी मठ (ता. लांजा) येथे नवीन मंदिर साकारायचा निर्धार केला. जिद्दीने केलेला हा निर्धार आता पूर्णत्वाला गेला आहे.
चालुक्य राजा अमोघवर्ष याच्या शके ६५८ मधील ताम्रपटात "कृष्णा, वेण्णा, कोयना यांच्या संगमावर करहाटक असे महाक्षेत्र असून ती तुझ्या पित्याची राजधानी आहे", असा उल्लेख आहे. चालुक्यांनी राष्ट्रकुटांना जिंकून इ. स. ९७३ ते ११८९ या काळात उत्तर चालुक्याचा वंश सत्ताधारी झाला. त्याचे मांडलीक (महामंडलेश्वर) शिलाहार यांनी सातारा, सांगली, कोल्हापूरप्रमाणे कोकणात रत्नागिरी, दापोली, खेड, चिपळूण, संगमेश्वर येथे सत्ता स्थापन केली. संगमेश्वरात राजधानी केली. त्यावेळी कर्ण हा त्यांचा पराक्रमी राजा झाला. पन्हाळगडावर विजयार्क राजाचा मुलगा भोज शिलाहार याने दक्षिण कोकणात आपला अंमल वसविला. त्याच्या कारकिर्दीत त्याने करहाटकमधून कोकणात बरीच ब्राह्मण घराणी आणली. असे जे लोक करहाटकातून खाली कोकणात आले, त्यांना लोक क-हाडे म्हणू लागले. क-हाडवरून देशावरच राहिले,
ते देशस्थ आणि कोकणात आले आणि राहिले, ते कन्हाडे असून ऋग्वेदी देशस्थांबरोबर क-हाड्यांचे रोटी-बेटी व्यवहार चालत आले आहेत. तेव्हाच्या करहाटक प्रांतात ऋग्वेदी आश्वलायन सूत्राचे शाकलशाखी ब्राह्मण होते. तेच हे क-हाडे. महाराष्ट्रात साधारण २४ गोत्रे आणि ५४५ आडनावे असलेले कन्हाडे ब्राह्मण आहेत. (कऱ्हाडे ब्राह्मणांबरोबरच इतर ज्ञातींमधील काही कुटुंबेही कोकणात येऊन स्थिरस्थावर झाली. त्यांचेही पल्लीनाथ हे कुलदैवत आहे.)
कोकण हा जंगलाने व्यापलेला, डोंगराळ भाग होता. म्हणून मुसलमानी प्रथेप्रमाणे खोतीच्या सनदा देऊन वस्ती करण्यास या मंडळींना सांगितले. प्रवासाची तुटपुंजी साधने, खडतर वाटा यांमुळे कन्हाडला वारंवार जाणे अशक्य होते, म्हणून दक्षिण कोकणातील ४०-५० कन्हाडे घराण्यांनी एकत्र येऊन मूळ देव लक्ष्मीरवळनाथाचा प्रतिनिधी म्हणून लक्ष्मीपल्लीनाथाची स्थापना करण्यात आली. कोल्हापूर-रत्नागिरी रस्त्यावर करंबेळे (पाली) येथे आणि कोल्हापूर, सांगली, साताऱ्याकडच्या लोकांनी कोल्हापूरपासून सुमारे १५ किलोमीटर अंतरावर रत्नागिरीच्या डोंगरावर जोतिबाची स्थापना केली. या दोन्ही देवांची रूपे सारखीच असून दक्षिणाभिमुख, रविवार हा उपासनेचा वार आणि चैत्र पौर्णिमा हा उत्सवाचा दिवस असे कुलधर्म, कुलाचारात साम्य आहे.
झाशीची राणी लक्ष्मीबाईचे माहेर तांबे आणि सासर नेवाळकर. या दोन्ही घराण्यांचा कुलस्वामी लक्ष्मीपल्लीनाथ. राणी पल्लीनाथाच्या दर्शनासाठी आली असता कुलस्वामी म्हणून लक्ष्मीपल्लीनाथाच्या नित्यपूजेसाठी वेदशास्त्रसंपन्न गजानन हळबे यांना सनद दिली. (ती आजही सुरू असल्याची नोंद सरकारदप्तरी आहे.) हळबे यांनी आजूबाजूच्या ब्राह्मण मंडळींसह १८५८ साली म्हणजे १६० वर्षांपूर्वी पल्लीनाथाचा वार्षिक चैत्रोत्सव करंबेळे येथे सुरू केला. लक्ष्मीपल्लीनाथाचे मंदिर बांधल्यावर त्या गावाचे नाव पाली झाले. ब्राह्मणांनी १९१६ साली उत्सवाचे पुनरुज्जीवन केले. तेथे तेव्हाच्या ६०-७० ग्रामस्थांनी श्रीलक्ष्मीपल्लीनाथ उत्सव व्यवस्थापक मंडळाची स्थापना करून हा उत्सव सुरू केला. त्याचे सर्व सभासद कन्हाडे ब्राह्मण होते. विष्णु वासुदेव आठल्ये (इनामदार खोत, शिपोशी) हे १९४६ सालापर्यंत त्या व्यवस्थापक मंडळाचे अध्यक्ष होते. देवळाचा जीर्णोद्धार आणि देवळाभोवती ओवऱ्या (पापडी), महामार्गापासून देवळापर्यंत रस्ता, विहीर, तळ्याची दुरुस्ती इत्यादी कामे त्या मंडळाने करून घेतली. ही संस्था १९५२ साली नोंदणीकृत करण्यात आली. त्यानंतर देणग्या जमा करून पूर्ववत उत्सव सुरू ठेवला. उत्सव व्यवस्थापक मंडळ स्थापन झाले. लक्ष्मीपल्लीनाथाची भक्त मंडळी देशभर
पसरलेली होती. त्यांच्यामार्फत नित्यपूजेची व्यवस्था होती; परंतु त्यानंतर काही काळ उत्सव मंडळाच्या कार्यात काहीशी मरगळ आली. आजूबाजूच्या गावांतील काही कुलोपासक शिधासामग्री आणून कसाबसा उत्सव पार पाडत असत. दैनंदिन पूजा होऊ लागली: परंतु अन्य कार्यक्रम किंवा इमारतीची डागडुजी होत नव्हती. पुन्हा एकदा जीर्णोद्धार करण्याची आवश्यकता लक्षात घेऊन मुंबईचे आर्किटेक्ट वसंतराव नाटेकर, भाटे यांच्या साह्याने ब्राह्मण मंडळींनी उत्सव व्यवस्थापक मंडळ आणि लक्ष्मीपल्लीनाथ देवस्थान या ट्रस्टने एकत्र येऊन गावाचे तत्कालीन खोत नारायणराव सावंत यांच्या नेतृत्वाखाली एकत्रितरीत्या मंदिराचा जीर्णोद्धार केला. त्यामध्येही मोलाचा वाटा कुलोपासकांचा होता. भक्तनिवासासह इतर सुविधांची व्यवस्था तेथे करण्यात आली. तसेच वर्गणीद्वारे जोरदार उत्सव सुरू केला.
कुटुंबामुख जशी घरातील सर्वांची काळजी घेतो, तसाच प्रत्येक घराण्याचा कुलस्वामी त्या त्या घराण्याचे रक्षण करतो, अशी दृढ भावना असल्यामुळे कुलस्वामीच्या स्थानाला भेट देणे, त्याचे कुलाचार सांभाळणे, अभिषेक, उत्सव इत्यादी करून त्याची कृपा संपादन करण्याचा यथाशक्ती प्रयत्न प्रत्येक जण करत असतो. याच भावनेने शेकडो वर्षे परंपरेने कुलस्वामी श्रीलक्ष्मीपल्लीनाथाची सेवा कुलोपासकांकडून केली जात होती. नोदणीकृत मंडळामार्फत उत्सवाची वर्गणी आणि मंदिरासाठी देणग्या संकलित केल्या जात. त्यातून उत्सवाचा खर्च केला जात असे. तसेच मंदिराची दुरुस्ती, जीर्णोद्धार तसेच नवीन सुविधा निर्माण केल्या जात असत. नारायणराव सावंत यांच्या कारकिर्दीत उत्सवही खेळीमेळीच्या वातावरणात होत असे. शतक महोत्सवाकडे वाटचाल करणाऱ्या दरवर्षीच्या चैत्रोत्सवाची निमंत्रणपत्रिका उत्सव मंडळातर्फे पाठविली जात असे. चैत्रोत्सवाचे पाच दिवस आणि श्रवण महिन्यातील प्रत्येक रविवार या दिवसांच्या उत्सवांचे व्यवस्थापन उत्सव मंडळाकडे होते; परंतु २०१२ साली त्यात अचानक बदल झाला. उत्सव मंडळाऐवजी नव्याने स्थापन झालेल्या पालीतील लक्ष्मीपल्लीनाथ देवस्थान पा व्यवस्थापनातर्फे पत्रिका पाठविण्यात आली. त्यामुळे भक्तांमध्ये आणि प्रामुख्याने कुलोपासकांमध्ये संभ्रम निर्माण झाला. मंदिराचे मानकरी आणि खोत संतोष सावंतदेसाई यांच्याकडे त्याबाबतची विचारणा करण्यात आली. परंतु समर्पक उत्तरे मिळाली नाहीत. त्यामुळे प्रत्यक्ष उत्सवापूर्वी व्यक्तिशः सभा-बैठका घेऊन त्यातून मार्ग काढायचे खूप प्रयत्न केले. ते निष्फळ ठरले. उत्सव व्यवस्थापन मंडळाच्या परंपरेऐवजी मंदिर व्यवस्थापनामार्फतच उत्सव साजरा करण्यावर ते ठाम राहिले. म्हणून मुंबईतील ad. अभय टिकेकर यांच्या नेतृत्वाखाली उत्सवाच्या आधी दोन दिवस मंदिरात पाली गावच्या ११ मानकन्यांबरोबर सभा घेऊन उत्सव मंडळाला परंपरेप्रमाणे उत्सव करू द्या. एवढीच मागणी करण्यात आली. त्याला कोणी विरोध केला नाही. उत्सव नेहमीप्रमाणे करण्याचे ठरलेः परंतु प्रत्यक्षात उत्सव सुरू होताच पावत्या फाडण्याकरिता उत्सव व्यवस्थापक मंडळाला प्रतिबंध करण्यात आला. त्यानंतर मंदिराच्या आवारानजीक सहाणेवर ग्रामस्थांसमोर खोत आणि सुमारे ४० कुलोपासकांची बैठक झाली. बैठकीत कुलोपासकांच्या वतीने यशवंत आठल्ये यांनी
लिखित स्वरूपात उपलब्ध असलेला इतिहास आणि परंपरांची माहिती दिली. हा इतिहास सर्वांनी मान्य करावा, अशी अपेक्षा नाही, असेही त्यांनी नमूद केले. असा इतिहास असला, तरी आम्हाला कोणतेही अधिकार किंवा हक्कांची अपेक्षा नाही, केवळ परंपरेप्रमाणे चालत आलेला पाच दिवसांचा चैत्रोत्सव आणि पाच दिवसांचा श्रावणोत्सवाचे व्यवस्थापन उत्सव व्यवस्थापन मंडळामार्फतच व्हावे, एवढीच अपेक्षा आहे, असे सांगितले. खोतांनी मात्र त्याला सहमती दर्शविली नाही. उलट यापुढे मी सांगेन, तसेच होईल, असे बजावले. उत्सव बंद झाला, तरी चालेल; पण माझ्या व्यवस्थापनानेच उत्सव होईल, असेही त्यांनी निक्षून सांगितले.
नोंदणीकृत मंडळामार्फत उत्सव साजरा करण्याची वर्षानुवर्षे चालत आलेली परंपरा मोडीत निघाल्याने त्यावर विचारविनिमय करण्यासाठी कुलोपासकांची बैठक टिके (ता. रत्नागिरी) येथे झाली. पालीतील पल्लीनाथाच्या मंदिरात उत्सवासाठी आणि अन्य कामांसाठी आता कुलोपासक ब्राह्मणांनी खर्च करायचा नाही, आर्थिक सहभाग घ्यायचा नाही, असे पावेळी ठरविण्यात आले. पुढे काय, याबाबतचे तीन प्रस्ताव पावेळी चर्चेसाठी आले. उत्सव नोंदणीकृत मंडळामार्फत चालविला जात असे. त्याची योग्य ती सर्व कागदपत्रे असल्याने न्यायालयात दाद मागावी, असा एक विचार पुढे आला. काहींनी असे सुचविले की, पल्लीनाथ हे आपले उपास्य दैवत असल्याने आपण तेथे आपली सेवा करावी. परंपरा नसली, तरीही खोतांच्या अटी मान्य करून त्यांच्या सूचनांचे पालन करून उत्सवात सहभागी व्हावे, असा हा प्रस्ताव होता. उत्सव स्वतंत्रपणे साजरा करावा, अशीही एक सूचना आली आणि पाच वेळी पारंपरिक पद्धतीने पल्लीनाथाचा स्वतंत्र उत्सव करण्याच्या विचाराचे बीज पेरले गेले.
त्यावर्षीच्या श्रावण महिन्यात चारही रविवारी टिके येथील श्रीराम मंदिरात महारुद्र स्वाहाकार करून या विचाराच्या दिशेने पहिले पाऊल पडले. या श्रावणोत्सवाला ब्राह्मण शातीतील सर्व शाखांचाही चांगला पाठिंबा मिळाला. सुमारे ५०० लोक एकत्र आले. तेथेही बराच विचारविनिमय झाला आणि त्यातूनच प्रेरणा घेऊन स्वतंत्र संस्थाच स्थापन करण्याचे ठरविले गेले. पल्लीनाथाचे एक मंदिर असताना दुसरे मंदिर किंवा संस्था स्थापन करणे योग्य होईल का, अशी शंका उपस्थित झालीः मात्र पल्लीनाथ हे स्वयंभू दैवत नाही. सात-आठशे वर्षांपूर्वी आपला कुलस्वामी असलेल्या लक्ष्मीपल्लीनाथाची स्थापना आपल्या पूर्वजांनी करंबेळे (पाली) पेथे केली होती. वाहतुकीच्या साधनांच्या अभावामुळे तेव्हा कन्हाडला जाणे शसदायक ठरल्याने तेव्हा आपल्या कुलस्वामीला आपल्याकडे आणले गेले. त्याच मंदिरात कुलस्वामीच्या सेवाकार्यावरच आता प्रतिबंध आल्याने पुन्हा एकदा कुलस्वामीसाठी नवे स्थान निर्माण करण्याचा विचार पुढे आला. तेव्हा सारे शून्यातून उभारले गेले होते. आपल्या पूर्वजांचाच कित्ता गिरवून पुन्हा एकदा तसेच करायचे ठरविले गेले. मंदिर स्थापन करायचे ठरविण्यात आले. सुमारे आठशे वर्षांपूर्वीच्या इतिहासाची पुनरावृत्ती करण्याच्या विचाराची मुहूर्तमेढ रोवली गेली. त्यातून श्री देव लक्ष्मीपल्लीनाथ संस्थानाची स्थापना झाली.
कुलोपासकांनी साकारले कुलस्वामीचे मंदिर
श्रीलक्ष्मीपाशीनाथ संस्थानाची स्थापना झाल्यानंतर मंडळ अस्तित्वात आले सुधाकर चांदोरकर यांची अध्यक्षपदी निवड झाली. मंदिराच्या न्यासाची १७ऑक्टोबर २०१२ रोजी रीतसर नोंदणी झाली. न्यासाची नोंदणी करताना केवळ कुलोपासकांसाठी नव्हे, तर समस्त ब्राह्मण शातीसाठी या न्यासाची सभासद नोंदणी खुली करण्यात आली. केवळ ब्राह्मण असल्याने पूर्वीच्या मंदिराच्या व्यवस्थेतून बाहेर पडण्याची वेळ आली होती. ते लक्षात घेऊन सर्वच ब्राह्मणांना नव्या मंदिराच्या कार्यात सभासद म्हणून सहभागी करून घेण्याचे आवर्जून ठरविण्यात आले.
नवे मंदिर उभारणीचा निश्चय झाल्यानंतर जागेची शोधमोहीम सुरू झाली. काही जागा शोधल्या. अखेर मठ (ता. लांजा) येथे राशिभाऊ गुण्ये यांनी २ एकर जागा नाममात्र मोबदल्यात मंदिरासाठी उपलब्ध करून दिली. मुंबई-गोवा महामार्गाला लागून असलेली कोट्यवधीच्या किमतीची जमीन मंदिराकरिता मिळाल्याने कुलोपासकांचा उत्साह दुणावला. नवी जागा हाती आल्यानंतर तेथे २ जानेवारी २०१३ रोजी भूमिपूजन झाले. भूचक्र पश करण्यात आला. मंदिर उभारण्याच्या दृष्टीने एकत्रीकरण झाले, त्यात तरुणांचा सहभाग मोठा होता. कुलोपासकांबरोबरच ज्ञातीतील अन्य लोकही उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. त्या सर्वांनी श्रमदान केले. मंदिराची उभारणी कशी करावी, रचना कशी असावी, याबाबत ऊहापोह झाला. शास्त्रशुद्धरीत्या. पुराणांचा आधार घेऊन उभारणी करायचे ठरविले. निधी संकलित करण्याचा संकल्प करण्यात आला. सर्व कुलोपासकांनी आर्थिक हातभार लावला. सर्व कुलोपासकांनी दिणग्या दिल्या. त्यानंतर दर महिन्याला ठरावीक देणगी देणारे अनेक कुलोपासक आहेत. त्यांच्या अर्थसाह्यातून नियोजित प्रकल्प २०१८ साली पूर्ण झाला आहे.
मठ येथे मंदिरासाठी जागेचा ताबा घेतल्यानंतरचा पहिला उत्सव २०१३ चा घुमटी बांधून तेथे करायचा निर्णय घेण्यात आला. तेव्हा मूर्ती तयार नव्हती, म्हणून तसबीर ठेवून उत्सव करायचे ठरविण्यात आले; मात्र उत्सव पाच दिवसांवर आला, तरी घुमटीच्या सभोवतालचा परिसर ओबडधोबड होता. तेथे फिरणे आणि कार्यक्रम करणे शक्य नव्हते. किमान पाचशे लोक तेथे येणे अपेक्षित होते. त्यामुळे तातडीने सर्वांनी श्रमदान करून परिसर स्वच्छ केला. सुमारे दोन हजार चौरस फुटाचा सभामंडपाचा चौधरा उभारण्यात आला. या कामात अक्षरशः आबालवृद्धांनी रात्रंदिवस हातभार लावला. ज्याला जे जे शक्य होते. ते ते काम त्याने केले. अवघ्या पाच दिवसांत एवढे काम होईल, अशी कल्पनासुद्धा कोणाला करता आली नसती. उत्सवात बाहेरगावाहून आलेल्या भक्तांनी त्याबद्दल आश्चर्यच व्यक्त केले. पहिल्याच उत्सवाकरिता पारंपरिक पद्धतीची पालखी सतीश चांदोरकर यांनी तयार करून दिली. सुमारे दोन लाखाचा खर्च आला. पहिली दोन वर्षे तसबीर ठेवूनच उत्सव करण्यात आला. लवकरात लवकर मंदिरात उत्सव साजरा करण्याचा निर्धार करण्यात आला.
मंदिराची रचना आकर्षक आणि सुबक असावी, याबाबत सर्वांचे एकमत होते. ही रचना प्राविडी पद्धतीची करावी, असे ठरले. मूलतः काळ्या पाषाणाचे आणि कोकणातील नैसर्गिक उपलब्ध असलेल्या जांभ्या दगडापासून मंदिर उभारायचे ठरविण्यात आले. गर्भगृह, प्रदक्षिणा मार्ग, सभामंडप आणि मेघडंबरी अशी भव्य इमारत निश्चित करण्यात आली. मंदिरांचा गाभारा म्हटले की कोंदट, कमी प्रकाश आणि अगदी अरुंद खोली असे चित्र डोळ्यांसमोर उभे राहते. त्याला छेद देऊन गाभारा प्रशस्तच असला पाहिजे, याची खूणगाठ बांधण्यात आली. त्यानुसार सुमारे सव्वादोनशे चौरस फुटाचा गाभारा २०१४ मध्ये उभा राहिला. जांभ्या दगडातील कोकणातील पाषाणाचा वापर करून द्राविडी पद्धतीचा, कोरीव काम असलेला कळस उभारला, तर ते वेगळेपण ठरेल, हे लक्षात घेऊन तशी रचना करण्यात आली. गोमुख, गाभाऱ्याचे महिरपी सिंहद्वार आणि गणेशपट्टी तसेच मूर्तीही म्हैसूरमधील मुद्गल प्रकारातील पाषाणातून घडविण्यात आल्या. महिरपीची कलाकुसर अप्रतिम झाली आहे. यशमंडपही शास्त्रीय पद्धतीने सज्ज करण्यात आला. भोजनगृह, स्वच्छतागृह अशा सुविधाही निर्माण करण्यात आल्या. मंदिर उभारले जात असतानाच दरवर्षी वाढत्या गर्दीत उत्सव साजरा गेला जात आहे. उत्सव पारंपरिक पद्धतीने करायचा. आरत्या, कीर्तन, भोवत्यांना योग्य तेवढा अवधी दिलाच पाहिजे, त्यानंतर शिल्लक राहिलेल्या वेळेतच सांस्कृतिक कार्यक्रम केले जातील, असा दंडक ठरविण्यात आला.
दोन वर्षांनी म्हणजे २०१५ साली पल्लीनाथाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. ध्यानमंत्राप्रमाणे ही मूर्ती तयार करण्यात आली आहे. सुबक मूर्ती कोटे उपलब्ध होतील. याचा धांडोळा घेण्यात आला. अखेर पिंगुळी (ता. कुडाळ, जि सिंधुदुर्ग) येथील गुडिगार बंधूकडे मूर्ती घडविण्याची कामगिरी सोपविण्यात आली लक्ष्मीपल्लीनाथाच्या या मुख्य मूर्तीबरोबरच गणपती आणि महालक्ष्मीच्या मूर्तीही घडविण्यात आल्या. पल्लीनाथाची मूर्ती ४५ इंच, तर अन्य दोन मूर्ती प्रत्येकी २७ इंच उंचीच्या आहेत. प्राणप्रतिष्ठा उत्सव मोठ्या थाटात झाला. वाजतगाजत मूर्ती आणण्यात आल्या. कोकणात दुर्मिळ असलेली आणि गोव्यासह दक्षिण भारतात केल्या जाणान्या पंचकुंडी पशासह प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. त्यासाठी स्थानिक ब्रह्मवृंदांनी आग्रह धरला होता. सुमारे चाळीस वेदमूर्तीनी तीन दिवसांची सेवा विनामोबदला केली स्थानिक तसेच मुंबई-पुण्याचे ब्रह्मवृंद त्यात सहभागी झाले होते. आपल्या कुलस्वामीचे स्वतंत्र मंदिर उभारायचे पल्लीनाथाच्या कुलोपासकांनी ठरविल्यानंतर गेल्या सात वर्षात अपेक्षेपेक्षाही सुंदर वास्तू तयार झाली आहे. मंदिराच्या पूर्ण उभारणीचा प्रकल्प सुमारे दोन कोटीचा असून आतापर्यंत निम्म्याहून अधिक खर्च झाला आहे. आर्थिक अनंत अडचणी येऊनही लोकांच्या भरघोस सहकायनि एक देखणी वास्तू तयार झाली आहे त्यावर आता दिमाखदार कळस चढविला गेला आहे.